November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

आदरणीय शाहू महाराज, आपण चुकलात!

1 min read

‘जाणत्या’ अजाणत्या राजकारणी लोकांच्या खूप मोठ्या षडयंत्राला आपण बळी पडला आहात. त्या लोकांनी अशी अनेक मोठ मोठी घरे फोडली आहेत. ते छत्रपती घाराण्या बाबत होऊ नये म्हणून हे विनंती चे उघड पत्र.

महाराज, महाराष्ट्राला पडलेले दिव्य स्वप्न म्हणजे तुमचे सुपुत्र संभाजी राजे आहेत. त्यांच्याविषयी राजकारण्यांचे ऐकुन बोलण्या आधी एकदा तुम्ही तुमच्या मुलाचे ऐकुन घेतले असते तर तुम्ही हे असे बोलला नसता. आपण छत्रपती आहात आमची काहीच पात्रता आपल्याला सांगायची. तरी छत्रपती संभाजी राजेंच्या सोबत दिवसरात्र राहिलेला आणि त्यांच्यातला प्रामाणिकपणा, सच्चेपणा, दिव्यत्व जाणून घेतलेला मी एक आहे. आपल्या राजघराण्याच्या अत्यंत जवळून काम केलेला व्यक्ती आहे.

जवळपास एक वर्ष झाले मी राजेंपासून पासून लांब आहे. त्यामुळे आपण देखील भेटलो नाही. त्यापूर्वी आपल्याशी अनेकवेळा भेटलोय. आपण महाराज आहात म्हणून आपल्याशी बोलण्याचे धाडस कुणीच करत नसायचे. परंतु अनेकदा धाडस जुटवून संभाजीराजेंच्या चांगल्या गोष्टी आपल्याला सांगायचो. तुमच्यावर राजेंचे असलेले प्रेम आणि आदर आपल्याला कळावा हा हेतू असायचा. कारण होते की संभाजीराजे तुमच्या विषयी असलेले प्रेम व्यक्त करू शकत नसत. मी ते नेहमी पहायचो. तुमच्या एका शाबासकीसाठी, एखाद्या किरकोळ कौतुकासाठी राजे वर्ष वर्ष वाट बघायचे.

महाराज, मी तुम्हाला अनेकवेळा सांगितले होते, की संभाजीराजे एवढा पित्र-भक्त मुलगा देशात दुसरा शोधून सापडायचा नाही. केवळ तुम्हाला वाईट वाटेल म्हणून राजेंनी स्वतः च्या राजकीय करीयरवर पाणी सोडले. राजेंना भाजप ने खासदार केले, केवळ या एकाच गोष्टीचा राग तुम्हाला होता. तुम्ही संभाजीराजेंना झिडकारता ते बरोबर नाही. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, तुम्ही जर संभाजीराजांना समजून घेतले असते तर आज राजे केंद्रात मंत्री असते. महाराज, एक लक्षात घ्या संभाजीराजे जगातल्या कोणत्याच व्यक्तीला भीक घालत नाहीत, टीकाकारांनातर नुसते दुर्लक्ष करून मारतात. या पृथ्वीतलावर संभाजीराजे केवळ तुम्हाला भितात. तुमच्यावर अत्यंत प्रेम आणि जीव असल्याने, तुमचा नितांत आदर करत असल्याने, तुम्हाला अजुन जास्त वाईट वाटेल, म्हणून राजेंनी भाजपच्या मंचावर जाणे टाळले. केंद्रात मिळत असलेले मंत्री पद नाकारले. याचा मी साक्षीदार आहे. महाराज संभाजी राजे सारखा मुलगा लाभणे तुमचे भाग्य आहे. जगात असा मुलगा शोधून सापडणार नाही. हे मी तुम्हाला बोलल्या नंतर आपण खुश होऊन मला तुमच्या अंगावर असलेला कोट भेट म्हणून दिला होता. तो कोट मी आजही जपून ठेवला आहे. हा प्रसंग पुण्यातल्या क्रिकेट स्टेडियम मध्ये घडलेला आहे. क्रिकेट मॅच संपल्यावर आपण बोलत उभे होतो.

आदरणीय महाराज, मी विनम्रतापूर्वक आजही विनंती करतो. आपण संभाजीराजांच्या प्रेमाला समजून घ्या. मला विश्वास आहे की, स्वतःच्या आयुष्याचे वाट्टोळे झाले तरी तुमची ते अज्ञा मोडणार नाहीत. एक शिवभक्त म्हणून विनंती करतो, महाराज तुम्ही राजेंवर चुकीच्या पद्धतीने बोलू नका. त्यांच्या राजकाणा वर चुकीच्या पद्धतीने बोट दाखवेल असे बोलू नका. आजपर्यंत खूप झाले. आता अजुन त्यांचे खच्चीकरण करू नका.

महाराज, आपण एक गोष्ट समजून घ्या. प्रस्थापित राजकारणी लोकांना तुमच्या मुलाची भीती वाटते. कारण त्यांच्या मुळावर संभाजीराजे उठलेत अशी सार्थ भीती त्यांना वाटते. त्यामुळे जाणीवपूर्वक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन संभाजीराजेंवर ‘वार’ केला आहे. तुम्ही षडयंत्राला बळी पडला आहात हेच सत्य आहे.

एक गोष्ट निक्षून सांगतो. कोणी कितीही षडयंत्र करण्याचे प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातली सामान्य जनता संभाजीराजांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. छत्रपती घराण्यातले ते पहिले मुख्यमंत्री होणार हेही त्रिवार सत्य आहे. स्वराज्य निर्माण करणार.

तुम्हाला वाईट वाटले तरी हरकत नाही. पण गादीवर प्रेम करणाऱ्या मावळ्यांना छत्रपतींना चूक काय आणि बरोबर काय हे सांगण्याचा अधिकार आहे. तो तसा आम्हा रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांनीच बहाल केला आहे. आणि विशेष करून छत्रपती घराण्यात फूट पाडणारे, आजचे राजकारणी असतील, तर आम्ही बोलणारच.

योगेश केदार
9823620666

https://www.facebook.com/100006755677570/posts/3301434786758345/?d=n
Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.